विकिपीडिया:छळणूक
हे पृष्ठ मराठी विकिपीडियाचे एक धोरण सादर करीत आहे. हे, सर्वसामान्यपणे स्वीकारलेल्या एका मानकाचे वर्णन करते, ज्याचे सर्व सदस्य/संपादक साधारणपणे अनुसरण करतात. या धोरणात काही बदल करावयाचा असल्या तो बदल विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे पानावर प्रस्तावित करणे व मंजूर करणे आवश्यक आहे. |
सदसद्विवेकबुद्धीने पाहिले असता, विशिष्ट व्यक्तीला किंवा व्यक्तींना जाणीवपूर्वक लक्ष्य करून केलेले जाचक वर्तन किंवा वर्तणुकीचा पॅटर्न म्हणजे छळणूक होय. सहसा (नेहमी नसला, तरी बह्वंशी) लक्ष्य केलेल्या व्यक्तीला/व्यक्तींना सतावल्यासारखे, दबाव आल्यासारखे किंवा काच असल्यासारखे वाटावे आणि तेणेकरून विकिपीडियावरील संपादनाचा त्यांचा आनंद हिरावून घेणे, त्यांना हादरवणे/घाबरवणे किंवा हतोत्साह, व अंती संपादने करण्यापासून परावृत्त करणे, असा छळणुकीचा हेतू असतो.
याशिवाय थेट टिप्पणी/वाद/संवाद न घडतादेखील लक्ष्य केलेल्यांच्या ध्यानी येतील व गर्भितार्थाने त्यांच्यावरच रोख असल्याचे कळेल, अशा बेताने केलेली कृत्येदेखील छळणुकीत गणली जाऊ शकतात.
छळणूक आणि उपद्रव
एखाद्या व्यक्तीला किंवा व्यक्तिसमूहाला लक्ष्य करून, ते संपादन किंवा चर्चा करत असलेल्या अनेक पानांवर जाऊन त्या ठिकाणी त्यांच्या कामास उपद्रव होईल असे वागणे किंवा वादंग उभे करणे, हा पाठलाग करण्यासारखा प्रकार होय. यामागे त्या संपादकांना वैताग देण्याचा किंवा चिरडीस आणण्याचा उद्देश असू शकतो. अशा प्रकारच्या विकिपाठलागासह वैयक्तिक हल्ले किंवा कोशकार्याला उपद्रव होईल अशी वर्तणूक केल्यास उपद्रव करणाऱ्यांवर ब्लॉक किंवा अन्य संपादनविषयक प्रतिबंध लावले जाऊ शकतात.
इतरांना त्यांचे विकिपीडियावरील काम बंद पाडण्याच्या, "बाहेर बघून घेण्याच्या", कायदेशीर कारवाई करण्याच्या धमक्या देणे, हादेखील छळणुकीचा भाग असू शकतो.
अन्य संपादकांविषयीची वैयक्तिक माहिती - म्हणजे नाव, जन्मदिनांक किंवा वय, वैयक्तिक नातीगोती, घरचा अथवा कार्यालयाचा पत्ता, हुद्दा, कोणत्याही स्वरूपाचे ओळख-क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, ईमेल पत्ते किंवा अन्य कोणतेही संपर्काचे तपशील, इत्यादी - मग ते अचूक असोत वा नसोत - त्यांनी स्वतः उघड केली नसताना जाहीर करणे, हादेखील छळणुकीचा प्रकार ठरतो.
“ | एखाद्या संपादकाविषयी मनात राग बाळगून वा पूर्वग्रहदूषित मत बनवून त्याला विकिपीडिया सोडून जाण्याविषयी सूचकार्थी टाटा, बाय बाय, गुडबाय, कळावे लोभ असावा, पुन्हा भेटू अशी जाणीवपूर्वक सूचकार्थी शब्दयोजना करणे हा छळणुकीचा भाग आहे. ही मंडळी एखाद्याने विकिपीडिया सोडून जावे या उद्देशाने जाणीवपूर्वक अशा सूचकार्थी शब्दांची योजना करतात. | ” |
छळणुकीस तोंड देणे
तुम्हांस आपली छळणूक केली जात आहे, असे वाटल्यास बावरून न जाता धीराने काम करा. काही वेळा संपादने करताना उद्भवलेल्या वादविवादातून वातावरण तापू शकते - अशा वेळेस छळणुकीचा अनुभव तुम्हांला आल्यास, वादनिवारणाचे साहाय्य घेता येते.
छळणूक करण्याचे परिणाम
सहसा एखाद-दुसऱ्या प्रसंगांपुरता मामला असल्यास, संपादकांनी सौजन्याने व सामोपचाराने परस्परांतील मामले मिटवणे इष्ट असते; अर्थात याचा अर्थ छळणुकीचे असे मामले सहज खपू शकतात असा मात्र नव्हे. छळणुकीमागे विशिष्ट पॅटर्न दिसून आल्यास, मलिन हेतू आढळल्यास असे प्रकार उपद्रव म्हणून धरले जाऊ शकतात. छळणूक वाटण्यासारख्या पद्धतीने वागणाऱ्या आणि/किंवा वैयक्तिक हल्ले करणाऱ्या सदस्यांवर ब्लॉक, अटकाव अशा प्रकारची गंभीर कारवाई होऊ शकते.
नोंदी
- ^ येथील मुद्दा सध्या येथे हलवलेला आहे
- ^ खास अधिकार असलेल्या लोकांनी या अवतरणातील मजकूर येथून वगळेपर्यंत वा इतरत्र हलवेपर्यंत हा अवतरणातील मजकूर म्हणजे या पानाचा भाग नाही असे समजून डोळेझाक करून हे पान वाचावे
- ^ येथील मुद्दा सध्या येथे हलवलेला आहे