[go: up one dir, main page]

Jump to content

सिबिल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड (लघुरूप -सीआयबीआयएल) ही पतमानांकन करणारी संस्था आहे. हिची स्थापना रिझर्व्ह बँकेच्या सिद्दिकी समितीच्या शिफारशीनुसार २००० साली करण्यात आली.

भारतीय नागरिकांच्या तसेच कंपन्यांच्या पत निर्धारणासंबंधी माहिती गोळा करणे तसेच पतमानांकन करणे हे सिबिलचे काम आहे.

साधारणतः २४०० बँका, आर्थिक संस्था तसेच बँक नसलेल्या अन्य आर्थिक संस्था सिबिलच्या सदस्य आहेत. या सर्व सदस्यांकडून आलेली सुमारे ५५ कोटी लोकांची पतविषयक माहिती सिबिलकडे जमा आहे.

२०१६ साली ट्रान्स युनियन या कंपनीने सिबिल मधील ८२ टक्के भाग भांडवल खरेदी केले. आता सिबिलचे नाव ट्रान्स युनियन सिबिल असे आहे

सिबिल स्कोअर

[संपादन]

२००७ साली सिबिलने बँका आणि आर्थिक संस्थांना उपयुक्त अशा पहिल्या भारतीय पतमानांकनाचे - 'सिबिल स्कोअर'चे - प्रतिरूप बनवले. २०११ पासून वैयक्तिक ग्राहकांनासुद्धा हा सिबिल स्कोअर देण्याची सोय करण्यात आली. आजकाल कर्ज देण्यापूर्वी सर्व बँका ग्राहकाचा सिबिल स्कोअर बघून कर्ज देण्याबद्दल निर्णय घेतात.

सिबिल स्कोअरसाठी माहिती जमा करण्याची पद्धत

[संपादन]

सिबिल स्कोअरसाठी बँकांकडून जमा झालेली माहिती वापरली जाते. दर तिमाहीच्या शेवटी सदस्य असणाऱ्या सर्व बँका सिबिलला आपण मंजूर केलेली कर्जे, परतफेडीची माहिती, तिमाहीत बुडीत गेलेली कर्जे, ग्राहकाचे के वाय सी तपशील (म्हणजे नाव, गाव, पत्ता, पॅन क्रमांक इत्यादी ) सिबिलकडे सोपवतात. सर्व बँकाकडून आलेला हा माहितीसाठा सिबिल जमा करून घेते.

बँकेकडे कुणी ग्राहक कर्ज मागण्यासाठी आला की बँका सिबिलकडे त्या ग्राहकाची माहिती मागतात. इतर सर्व सदस्य बँकाकडून आलेल्या माहितीचा धांडोळा घेऊन सिबिल त्या ग्राहकाची आर्थिक कुंडली बनवते. या ग्राहकाने कुठल्या बँकेकडून कर्ज घेतले, किती घेतले, परतफेड कशी केली, बुडीत झाले का? इत्यादी अनेक गोष्टी, ग्राहकाचा सिबिल स्कोअर मोजताना ध्यानात घेतल्या जातात.

औद्योगिक सेवा

[संपादन]

सिबिलने २०१० पासून खालील दोन सेवा खास औद्योगिक ग्राहकांसाठी देणे सुरू केले आहे.

१) सिबिल डिटेक्ट - अति जोखीम असणाऱ्या उद्योगांसाठी माहितीचा साठा

२) सिबिल मॉर्गेज चेक - मालमत्ता तारणाची माहिती असणारा भारतातील पहिला केंद्रीय माहितीसाठा

बाह्य दुवे

[संपादन]